Saturday, November 20, 2021

कृष्णमूर्ती पद्धती - जन्म लग्न शुद्धी. (५ मिनिटे ते अर्ध्या तासाचा फरक शोधणे)

 कृष्णमूर्ती पद्धती - जन्म लग्न शुद्धी. 


दिनांक ७ नोव्हेंबर २०२१ रोजी दुपारी २:३० च्या सुमारास श्री देशपांडे यांनी फोन केला. त्यांना त्यांच्या ३९ वर्षीय मुलासाठी विवाह योग कधी आहे हे माहित करून घ्यायचे होते. त्यांनी दिलेल्या  जन्म वेळ, तारीख आणि जन्म ठिकाण या तपशिलांनुसार कुंडली तयार करून विवाह योगाविषयी फलादेश करणे अवघड नव्हतेच पण त्यांनी ची. महेश याची जन्मवेळ दुपारी ४ चे दरम्यान असावी असे सांगितले. म्हणजे जन्म लग्न शुद्धी केल्याखेरीज पुढे जाणे शक्यच नव्हते ज्याला आपण इंग्रजीत बर्थ टाइम रेक्टिफिकेशन असे म्हणतो. श्री देशपांडे यांच्या म्हणण्यानुसार ची. महेशचा जन्म २० एप्रिल १९८२ रोजी पुणे येथे दुपारी ४ च्या दरम्यान झाला असावा, परंतु पुढे ते हे देखील म्हणाले कि ३:४५ ते ४:१५ या वेळे दरम्यान जन्मवेळ असावी. आता जन्म लग्न शुद्धी केल्याखेरीज पुढे जाणे म्हणजे चुकीचा फलादेश देण्यासारखेच झाले म्हणून दि. ७ नोव्हेंबर २०२१ रोजी दुपारी २ वाजून ५६ मिनिटांनी वसई येथील तत्कालीन कार्येश ग्रह (रुलिंग प्लॅनेट्स ) घ्यायचे ठरवले ते खालील प्रमाणे होते. 


लग्न स्वामी - शनी (कुंभ)

चंद्र नक्षत्र स्वामी - बुध (ज्येष्ठा नक्षत्र)

चंद्र राशी स्वामी - मंगळ (वृश्चिक) + केतू (मंगळाच्या राशीत असल्यामुळे केतू हि कार्येश ग्रहात आला)

वाराचा स्वामी - रवी (रविवार) 


आता जन्म दिवशी, जन्म वेळी म्हणजेच दि. २० एप्रिल १९८२ रोजी पुणे येथे दुपारी ४ च्या दरम्यान खालील लग्न उदित होती.

दुपारी ०२:०६ ते ०४:१४ - सिंह - स्वामी रवी

दुपारी ०४:१४ ते ०६:२० - कन्या - स्वामी बुध


म्हणजे जन्म सिंह किंवा कन्या यापैकी लग्नावर झाला असे म्हणता येईल कारण रवी व बुध दोघेही रुलिंग मध्ये आहेत. त्यातूनही बुध नक्षत्र स्वामी म्हणून रुलिंग मध्ये आहे जो वाराच्या स्वामीपेक्षा बलवान आहे म्हणून जन्म कन्या लग्नावर झाला असे ठाम पणे म्हणता येईल.  म्हणजे जन्म वेळ दुपारी ४:१५ नंतरची निश्चित करावी लागेल. परंतु इथेच श्री देशपांडे पुन्हा मदतीला आले, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ची. महेश हा गोरा आहे, उदार स्वभावाचा आहे, त्याचे विचार व मते ठाम असतात. तो सर्वांची काळजी घेतो. विशेष म्हणजे कुटुंबातल्या वयस्कर व्यक्तींना तो विचारणं असतो. मित्रांवर खर्च करतो. एकूणच बचत करण्याविषयी त्याची वृत्ती बेफिकीर आहे. स्तुतिप्रिय आहे. मी सरळच श्री देशपांडे यांच्याकडून ची. महेशचा फोटो मागवला. तांबूस गोरा वर्ण, साधारण चांगली उंची, भव्य भालप्रदेश, सरळ व पुढे किंचित बाक असलेले नाक - हे वर्णन कन्या पेक्षा सिंह राशीला जास्त शोभून दिसत म्हणून जातकाच्या म्हणण्यानुसार ची. महेशचा जन्म हा सिंह लग्नावरच झाला असे निश्चित केले. इथे आवर्जून सांगावेसे वाटते कि जरी रुलींगमध्ये एखादा ग्रह बलवान असला तरी त्याच्यापेक्षा कमी प्रतीच्या ग्रहाचा विचार विशेष करून तेव्हा करावाच जेव्हा जातक स्वतः त्याविषयी ठाम असतो. म्हणजे ची. महेशचा जन्म दुपारी ०२:०६ ते ०४:१५ या दरम्यान सिंह लग्न उदित असताना झाला हे निश्चित केले. म्हणजे लग्न राशी सिंह (स्वामी - रवी) निश्चित झाला आता लग्न नक्षत्रस्वामी निश्चित करावा म्हणून रुलिंग मध्ये उरलेलं शनी, बुध, मंगळ व केतू या पैकी कोणाचा विचार करावा तर १ते १२९ च्या कोष्टकात सिंह राशीचे कोष्टक पाहिले तर नक्षत्रस्वामी म्हणून केतू, शुक्र व रवी यांचाच विचार करता येईल. त्यातूनही रवी वगळावा लागेल कारण तो आधीच आपण वापरला. केतूचा विचार केला तर जन्मवेळ दुपारी २:०६ ते ३:४५ दरम्यान येते. श्री देशपांडे तर म्हणतात कि जन्म वेळ निश्चितपणे ३:४५ ते ४:१५ दरम्यान आहे. म्हणजे नक्षत्र स्वामी म्हणून केतूचा विचार करताच येणार नाही. उरला शुक्र, तो तर रुलिंग मध्ये नाही मग कसे काय करायचे?  पण पुन्हा जेव्हा पंचांग पाहिले तेव्हा एक उलगडा झाला रवी तुला राशीत होता व नक्षत्र विशाखा म्हणजे अशावेळी रुलिंग मध्ये शुक्र (रवी राशी स्वामी ) व गुरु (रवी नक्षत्र स्वामी) म्हणून समाविष्ट करता येतीलच. आता शुक्र आपल्या रुलिंग मध्ये आहे म्हटल्यावर नक्षत्रस्वामी म्हणून शुक्र निश्चित केला. आता उपनक्षत्र स्वामी निश्चित करण्याकरीता आपल्याकडे शनी, बुध, मंगळ, केतू व गुरु हे ग्रह रुलिंग मध्ये आहेत. त्यापैकी लग्न स्वामी म्हणून शनी बलवान आहे, त्याखालोखाल नक्षत्रस्वामी म्हणून बुध बलवान आहे पण 'Nodes are always strong' कृष्णमूर्ती गुरुजींच्या मतानुसार रुलिंगमध्ये शेष ग्रहांपैकी उपनक्षत्रस्वामी म्हणून केतूची निवड केली. आता उरलेल्या शनी, बुध, मंगळ व गुरूंपैकी अर्थातच नक्षत्र स्वामी बलवान म्हणून उप उप नक्षत्रस्वामी म्हणून बुध  निश्चित केला. अशाप्रकारे रवी - शुक्र - केतू - बुध हि साखळी तयार झाली. याप्रमाणे सॉफ्टवेयरच्या मदतीने कुंडली तयार केली असता जन्म वेळ मिळाली  ती म्हणजे दुपारी - ०४:००:०८  म्हणजे ची. महेश याचे सुधारित जन्म तपशील - पुढील प्रमाणे 

जन्म तारीख : २० एप्रिल १९८२

जन्म वेळ : १६:०० (दुपारी ०४:००)

जन्म ठिकाण - पुणे. 

जन्म लग्न शुद्धी केल्यानंतर ती बरोबर झाली आहे का ते पाहण्यासाठी खालील नियमांची पडताळणी करणे गरजेचे असते. 

१) लग्नाचा उप उप नक्षत्रस्वामी व चंद्र नक्षत्रस्वामी ग्रह हे एकाच असावे. किंवा

२) लग्नाचा उप उप नक्षत्रस्वामी चंद्र नक्षत्रस्वामीशी संबंधित असावा. 


सुधारित जन्म वेळेप्रमाणे तयार केलेल्या कुंडलीत लग्नाचा उप उप नक्षत्रस्वामी बुध हाच चंद्राचा नक्षत्रस्वामी  गुरूशी संबंधित आहे. 


आता विवाह योग आहे कि नाही हे पाहणे सोपे झाले. 


क्रमशः ....

लेखक : ज्योतिषी श्री आमोद विष्णू ननावरे

सशुल्क ज्योतिष मार्गदर्शन 

संपर्क : 9890787502

Sunday, January 3, 2021

मकर संक्रांत 2021 फलित.

 नमस्कार मित्रहो,

सर्व प्रथम सर्वांना आंग्ल नववर्ष २०२१ च्या हार्दिक शुभेच्छा. नूतन वर्ष सर्वांना आनंदाचे, भरभराटीचे, उन्नतीचे, आरोग्याचे, ऐश्वर्याचे, समृद्धीचे जावो हीच समर्थ चरणी प्रार्थना. इंग्रजी नवं वर्षातला पहिला सण जर म्हणायचं झालं तर तो म्हणजे मकर संक्रांत. संक्रांत म्हणजे संक्रमण. स्थित्यंतर. धार्मिक दृष्ट्या या दिवसाला अनन्य साधारण महत्व तर आहेच पण ज्योतिष शास्त्रीय दृष्टिकोनातूनही मकर संक्रांत महत्वाची ठरते. ग्रह गोचर हि जी ज्योतिष संकल्पना आहे ती म्हणजे ग्रहांची एका राशीतून दुसऱ्या राशीत जाणे. मकर संक्रान्तिला सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. आपल्या ग्रहमालेत सूर्याला अतिशय महत्व आहे. सर्व ग्रहांचा राजा सूर्य. आरोग्याचा कारक सूर्य. आत्म कारक सूर्य. नेत्रज्योती कारक सूर्य, दर महिन्याच्या १४ ते १६ तारखेदरम्यान एका राशीतून दुसऱ्या राशीत गोचर भ्रमण करतो. कुठल्याही ग्रहाच्या एका राशीतून दुसऱ्या राशीत जातानाचा जो काळ असतो त्याला पर्व काळ असे म्हणतात.

शास्त्रानुसार त्या त्या ग्रहसंबंधी दान, जप, व्रताची सुरुवात हि पर्व काळात करणे विशेष लाभप्रद मानले जाते. सूर्याने मकर राशीत प्रवेश केल्यानंतर पहिल्या ४० घटका हा पुण्य काळ मानला जातो. याच दिवशी उत्तरायणाची सुरुवात होते. जसे चैत्र महिन्यात गुढी पाडव्याला आपलं नवीन वर्ष म्हणून म्हटलं जातं व त्या दिवशी वर्षफल जाणून घेण्याची धार्मिक प्रथा आहे त्याचप्रमाणे स्नक्रांतीच्या दिवशी संक्रांत फल व संक्रांतीचे वर्णन जाणून घेण्याची धार्मिक प्रथा असते. या संबंधी आणखी एक श्लोक वाचनात आला त्याविषयी तुम्हाला अवगत करावं म्हणून या लेखात त्याचा समावेश करण्याचा मोह आवरत नाहीये, 


“माघे मासे महादेव: यो दास्यति घृतकम्बलम।

स भुक्त्वा सकलान भोगान अन्ते मोक्षं प्राप्यति॥”


याचा अर्थ असा कि, जी व्यक्ती (शिव भक्त) या दिवशी (माघ मास) गरजूंना शुद्ध तूप व कांबळ दान करतो, त्या व्यक्तीला सर्व भोग (इच्छापूर्ती) प्राप्त होतात व शेवटी मुक्ती मिळते. या दिवशी केले गेलेले दान हे शांत पटीने पुण्यदायी असते. असो. 


१४ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ८:१४ मिनिटांनी सूर्याचा मकर राशीत प्रवेश होत आहे. पुण्य काळ हा सकाळी ८:१४ ते दुपारी ४:१४ असा असेल. संक्रांत पश्चिमेकडून पूर्वेकडे जातं असून आग्नेय दिशेकडे पाहत आहे. स्नक्रांतीचे वाहन सिंह असून उपवाहन हत्ती आहे. ती वयाने बाल (लहान) असून बसलेली आहे. तिने पांढरे वस्त्र नेसलेले असून कस्तुरीचा टिळा लावला आहे. तिच्या एका हातात चाफ्याचे फुल आहे तर दुसऱ्या हातात भृशुंडी हे शास्त्र आहे. तिने भूषणार्थ प्रवाळ हे रत्ना धारण केले असून ती अन्न ग्रहण करत आहे. तिची देव जाती असून वार नाव नंदा आणि नक्षत्र नाव महोदरी आहे.  


या दिवशी आपल्या वडिलांची विशेष सेवा करावी. सूर्य पूजा करावी. पवित्र नदीत स्नान करावे. दान करावे, नदी नसेल तर स्नानाच्या पाण्यात गंगा जल टाऊन स्नान करावे.  


संक्रांति फल.


ज्यांचे जन्म नक्षत्र उत्तराषाढा, श्रवण व धनिष्ठा आहे अशांचे प्रवास घडतील. शततारका, पुर्वा भाद्रपदा, उत्तरा भाद्रपदा, रेवती, अश्विनी व भरणी जन्म नक्षत्र असलेल्या जातकांसाठी सुखकारक आहे. कृत्तिका, रोहिणी आणि मृग नक्षत्र असलेल्या जातकांना काही मानसिक त्रास संभवतो. आर्द्रा, पुनर्वसू, पुष्य, आश्लेषा, मघा आणि पूर्वा नक्षत्राच्या जातकांना वस्त्र लाभ होईल. उत्तरा, हस्त व चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना काही नुकसान संभवते. स्वाती, विशाखा, अनुराधा, ज्येष्ठा, मूळ आणि पूर्वाषाढा नक्षत्राच्या जातकांना धनलाभ होईल.  


राशीनुसार करावयाचे दान.


मेष : तांब्याचे भांडे, मसूर डाळ. लाभ : शीघ्रकोपीपणा कमी होईल. 

वृषभ: चांदीची वस्तू, सफेद वस्त्र. लाभ : वैवाहिक सुख, कार्यसिद्धी

मिथुन: हिरवे मूग, भाज्या, पिवळे वस्त्र : वैवाहिक सुख 

कर्क: मोती, लोकरीचे सफेद रंगाचे वस्त्र. लाभ : मानसिक शांती - समाधान.

सिंह: गुळ, गहू. लाभ: सन्मान. 

कन्या: हिरवे मूग. लाभ: व्यापार वृद्धी.

तुला : ७ प्रकारच्या धान्याचे दान. लाभ: स्वास्थ्य वृद्धी.

वृश्चिक: लाल वस्त्र. लाभ: नोकरी संबंधित समस्या निवारण. 

धनु: सोने, पिवळे वस्त्र: लाभ - सन्मान.

मकर: काळ्या रंगाचे कांबळे. लाभ: वडिलांशी संबंधात सुधारणा.

कुंभ : मंदिरात तिळाचे तेल दान करावे. लाभ : कार्यसिद्धी. 

मीन: गुळ, छान डाळ. लाभ : सन्मान. 


तर मित्रहो तिळगुळ घ्या गोड गोड बोला. हि पोस्ट मोठ्या प्रमाणात लाईक व शेअर करा.