Sunday, January 3, 2021

मकर संक्रांत 2021 फलित.

 नमस्कार मित्रहो,

सर्व प्रथम सर्वांना आंग्ल नववर्ष २०२१ च्या हार्दिक शुभेच्छा. नूतन वर्ष सर्वांना आनंदाचे, भरभराटीचे, उन्नतीचे, आरोग्याचे, ऐश्वर्याचे, समृद्धीचे जावो हीच समर्थ चरणी प्रार्थना. इंग्रजी नवं वर्षातला पहिला सण जर म्हणायचं झालं तर तो म्हणजे मकर संक्रांत. संक्रांत म्हणजे संक्रमण. स्थित्यंतर. धार्मिक दृष्ट्या या दिवसाला अनन्य साधारण महत्व तर आहेच पण ज्योतिष शास्त्रीय दृष्टिकोनातूनही मकर संक्रांत महत्वाची ठरते. ग्रह गोचर हि जी ज्योतिष संकल्पना आहे ती म्हणजे ग्रहांची एका राशीतून दुसऱ्या राशीत जाणे. मकर संक्रान्तिला सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. आपल्या ग्रहमालेत सूर्याला अतिशय महत्व आहे. सर्व ग्रहांचा राजा सूर्य. आरोग्याचा कारक सूर्य. आत्म कारक सूर्य. नेत्रज्योती कारक सूर्य, दर महिन्याच्या १४ ते १६ तारखेदरम्यान एका राशीतून दुसऱ्या राशीत गोचर भ्रमण करतो. कुठल्याही ग्रहाच्या एका राशीतून दुसऱ्या राशीत जातानाचा जो काळ असतो त्याला पर्व काळ असे म्हणतात.

शास्त्रानुसार त्या त्या ग्रहसंबंधी दान, जप, व्रताची सुरुवात हि पर्व काळात करणे विशेष लाभप्रद मानले जाते. सूर्याने मकर राशीत प्रवेश केल्यानंतर पहिल्या ४० घटका हा पुण्य काळ मानला जातो. याच दिवशी उत्तरायणाची सुरुवात होते. जसे चैत्र महिन्यात गुढी पाडव्याला आपलं नवीन वर्ष म्हणून म्हटलं जातं व त्या दिवशी वर्षफल जाणून घेण्याची धार्मिक प्रथा आहे त्याचप्रमाणे स्नक्रांतीच्या दिवशी संक्रांत फल व संक्रांतीचे वर्णन जाणून घेण्याची धार्मिक प्रथा असते. या संबंधी आणखी एक श्लोक वाचनात आला त्याविषयी तुम्हाला अवगत करावं म्हणून या लेखात त्याचा समावेश करण्याचा मोह आवरत नाहीये, 


“माघे मासे महादेव: यो दास्यति घृतकम्बलम।

स भुक्त्वा सकलान भोगान अन्ते मोक्षं प्राप्यति॥”


याचा अर्थ असा कि, जी व्यक्ती (शिव भक्त) या दिवशी (माघ मास) गरजूंना शुद्ध तूप व कांबळ दान करतो, त्या व्यक्तीला सर्व भोग (इच्छापूर्ती) प्राप्त होतात व शेवटी मुक्ती मिळते. या दिवशी केले गेलेले दान हे शांत पटीने पुण्यदायी असते. असो. 


१४ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ८:१४ मिनिटांनी सूर्याचा मकर राशीत प्रवेश होत आहे. पुण्य काळ हा सकाळी ८:१४ ते दुपारी ४:१४ असा असेल. संक्रांत पश्चिमेकडून पूर्वेकडे जातं असून आग्नेय दिशेकडे पाहत आहे. स्नक्रांतीचे वाहन सिंह असून उपवाहन हत्ती आहे. ती वयाने बाल (लहान) असून बसलेली आहे. तिने पांढरे वस्त्र नेसलेले असून कस्तुरीचा टिळा लावला आहे. तिच्या एका हातात चाफ्याचे फुल आहे तर दुसऱ्या हातात भृशुंडी हे शास्त्र आहे. तिने भूषणार्थ प्रवाळ हे रत्ना धारण केले असून ती अन्न ग्रहण करत आहे. तिची देव जाती असून वार नाव नंदा आणि नक्षत्र नाव महोदरी आहे.  


या दिवशी आपल्या वडिलांची विशेष सेवा करावी. सूर्य पूजा करावी. पवित्र नदीत स्नान करावे. दान करावे, नदी नसेल तर स्नानाच्या पाण्यात गंगा जल टाऊन स्नान करावे.  


संक्रांति फल.


ज्यांचे जन्म नक्षत्र उत्तराषाढा, श्रवण व धनिष्ठा आहे अशांचे प्रवास घडतील. शततारका, पुर्वा भाद्रपदा, उत्तरा भाद्रपदा, रेवती, अश्विनी व भरणी जन्म नक्षत्र असलेल्या जातकांसाठी सुखकारक आहे. कृत्तिका, रोहिणी आणि मृग नक्षत्र असलेल्या जातकांना काही मानसिक त्रास संभवतो. आर्द्रा, पुनर्वसू, पुष्य, आश्लेषा, मघा आणि पूर्वा नक्षत्राच्या जातकांना वस्त्र लाभ होईल. उत्तरा, हस्त व चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना काही नुकसान संभवते. स्वाती, विशाखा, अनुराधा, ज्येष्ठा, मूळ आणि पूर्वाषाढा नक्षत्राच्या जातकांना धनलाभ होईल.  


राशीनुसार करावयाचे दान.


मेष : तांब्याचे भांडे, मसूर डाळ. लाभ : शीघ्रकोपीपणा कमी होईल. 

वृषभ: चांदीची वस्तू, सफेद वस्त्र. लाभ : वैवाहिक सुख, कार्यसिद्धी

मिथुन: हिरवे मूग, भाज्या, पिवळे वस्त्र : वैवाहिक सुख 

कर्क: मोती, लोकरीचे सफेद रंगाचे वस्त्र. लाभ : मानसिक शांती - समाधान.

सिंह: गुळ, गहू. लाभ: सन्मान. 

कन्या: हिरवे मूग. लाभ: व्यापार वृद्धी.

तुला : ७ प्रकारच्या धान्याचे दान. लाभ: स्वास्थ्य वृद्धी.

वृश्चिक: लाल वस्त्र. लाभ: नोकरी संबंधित समस्या निवारण. 

धनु: सोने, पिवळे वस्त्र: लाभ - सन्मान.

मकर: काळ्या रंगाचे कांबळे. लाभ: वडिलांशी संबंधात सुधारणा.

कुंभ : मंदिरात तिळाचे तेल दान करावे. लाभ : कार्यसिद्धी. 

मीन: गुळ, छान डाळ. लाभ : सन्मान. 


तर मित्रहो तिळगुळ घ्या गोड गोड बोला. हि पोस्ट मोठ्या प्रमाणात लाईक व शेअर करा.