नमस्कार वाचकहो,
सर्वप्रथम गुढीपाडवा व नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !!
स्तोत्र मंत्राच्या अध्भूत दुनियेत तुमचे मनःपूर्वक स्वागत. आपल्यापैकी अनेकजण नियमित काहीना काहीतरी साधना करतात. जपजाप्य, व्रतवैकल्य, पोथीवाचन इ. काही उपासना या काम्य असतात तर काही निष्काम. कुठल्याही उपासनेच विहित फळ आपल्याला अपेक्षित असत. प्रत्येकाचे एक विवक्षित आराध्य दैवत असतं. कोणी दत्त उपासक आहेत, कोणी देवी उपासक आहेत, कोणी हनुमान भक्त आहेत, कोणी कृष्ण भक्त, कोणी श्री स्वामी समर्थांची उपासना करतात, कोणी श्री गणेशाची उपासना करतात तर कोणी श्री रामाचे उपासक आहेत. आपल्या जन्म लग्न कुंडली वरून आपले उपास्य दैवत कोण आहे हे ठरवता येते. तसेही कोणा ना कोणा तरी भगवंताच्या अनेक रूपांपैकी एखादे आपल्याला विशेष भावते. आपल्या ऋषी मुनींनी या दैवतांचे विविध स्तोत्र व मंत्र मानव जातीला उपहार स्वरुपात दिले आहेत. कित्येक जन त्याचा प्रापंचिक आणि पारमार्थिक तसेच पारलौकिक लाभ घेत आहेत. पुराणात असे म्हटले आहे कि कुठल्याही स्तोत्र अथवा मंत्राची उपासना करावयाची असल्यास त्या स्तोत्र अथवा मंत्राचे विधान असते त्याप्रमाणेच ते करावे लागते तरच त्याचा पूर्ण लाभ घेता येतो. 'मंत्राधीनम देवता' याचा अर्थच असा कि देवता या त्या विवक्षित मंत्राच्या अधीन असतात. 'मननात त्रायते इति मंत्र' याचा अर्थ असा कि ज्याचे मनन केले असता तो तारतो तो मंत्र. थोडक्यात म्हणायचे झाले तर मंत्र किंवा स्तोत्र हे सिद्ध करावे लागतात तरच त्यांचा लाभ होतो.
रामरक्षा स्तोत्र. अतिशय अध्भूत आणि सामर्थ्यशाली असे हे स्तोत्र आहे. विष्णुसहस्त्रनाम या स्तोत्रात असा उल्लेख आहे कि आदिशक्ती भगवती पार्वतीने भगवान आशुतोष शिव शंकरांना असा प्रश्न विचारला होता कि असे कुठले नाम आहे कि ज्याचा उच्चार केला असता संपूर्ण विष्णुसहस्त्रनाम पठणाचे पुण्य मिळेल? त्यावर नीलकंठ महादेव शंकरांनी असे उत्तर दिले कि 'राम' हे एकच नाम आहे ज्यामुळे सर्व पापांचा नाश होतो. पारमार्थिक आणि प्रापंचिक कल्याण होते. संपूर्ण विश्नुसहस्त्रनाम पठणाचे पुण्य मिळते. 'रामं रमेशं भजे'. 'पद्मपुराणात' याचा संदर्भ आलेला आहे. राम नामाचा महिमा असलेलं हे स्तोत्र महादेवांनी पार्वतीला एकांतात सांगितले. पुढे महादेवांनी बुधकौशिक ऋषींना स्वप्नात या स्तोत्राचा महादेवांनी दृष्टांत दिला.
सर्व पापांचे निरसन करणारे, पूर्व कर्माचे संस्कार बीज नष्ट करणारे असे हे राम रक्षा स्तोत्र आहे. त्यातील प्रत्येक अक्षर अन अक्षर श्रीरामाच्या नाम सामर्थ्याने पुरेपूर भारलेलं आहे. या स्तोत्राच्या पठणामुळे निर्माण होणारे शक्तिशाली स्पंदन घरातील आणि मनातील नकारात्मक विचारांना, दुष्ट शक्तींना क्षणार्धात पळवून लावतात. असा अपेक्षित परिणाम साध्य करण्यासाठी हे रामरक्षा स्तोत्र सिद्ध करून मगच रोज ११ पाठ करणे अपेक्षित आहे.
मूळ रामरक्षा स्तोत्र हे ११ पंक्तींचे आहे. एकूण ३८ श्लोकांपैकी फक्त ६ श्लोकच 'रामरक्षा' म्हणून अंतर्भूत आहेत. ते खालील प्रमाणे.
शिरो मे राघवः पातु भालं दशरथात्मजः ||
कौसल्येयो दृशौ पातु विश्वामित्रप्रियः श्रुती |
घ्राणम पातु मखत्राता मुखं सौमित्रवत्सलः ||
जिव्हां विद्यानिधिः पातु कंठं भरतवन्दितः |
स्कन्धौ दिव्यायुधः पातु भुजौ भाग्नेशकामुर्कः ||
करौ सीतापतिः पातु हृदयं जामदग्न्यजीत |
मध्यं पातु खरध्वंसी नाभिं जाम्बवदाश्रयः ||
सुग्रीवेशः कटी पातु सक्थिनी हनुमत्प्रभुः |
उरू रघुत्तमः पातु रक्षःकुलविनाशकृत ||
जानुनी सेतुकृत्पातु जंघे दशमुखान्तकः |
पादौ बिभीषणश्रीदः पातु रामोखीलम वपुः ||
या रामरक्षा मंत्राच्या नित्य पठणामुळे साधकाचे दुष्ट शक्तीपासून संरक्षण होते. सूक्षम असे संरक्षक कवच साधकाच्या शरीराभोवती तयार होते. अपघातापासून संरक्षण होते. ज्या साधकाने हे स्तोत्र सिद्ध केले आहे तो साधक इतरांसाठी देखील याचा (अर्थात विनामूल्य) उपयोग करू शकतो.
रामरक्षा स्तोत्र सिद्ध करण्याकरिता चैत्र, श्रावण, अश्विन किंवा मार्गशीर्ष पौर्णिमा या विशेष चांगल्या आहेत. १९ एप्रिल २०१९ रोजी येणारी चैत्र पौर्णिमा हि सुद्धा विशेष लाभदायक आहे.
पहाटे सूर्योदयानंतर शौच मुखमार्जन व स्नान करून शुचिर्भूत होऊन घरातील नैमित्तिक नित्य पूजा करून झाल्यावर आसनावर उत्तराभिमुख बसावे. एका पांढर्या कागदावर सुरुवातीला ' श्री गणेशाय नमः' हे लिहावे. त्याखाली 'श्रीराम'; असे लिहावे. त्याखाली २ ओळी सोडून संपूर्ण रामरक्षा स्तोत्र काळ्या शायीच्या पेनाने लिहून काढावे. सर्वात शेवटी ३ वेळा ओमकार लिहावा. त्यानंतर एका पाटावर तांदूळ पसरावे. हे झाले आसन. तांदुळाच्या आसनावर तो कागद ठेवावा. त्याची पंचोपचार पूजा करावी. त्यानंतर रक्षामंत्र ११ वेळा म्हणावा. वरील पूजा पुढील ११ दिवस तशीच ठेवावी. रोज शुचिर्भूत होऊन रामरक्षा मंत्राचा ११ वेळा पाठ करावे. पंचोपचार पूजा करावी. (पुढील ११ दिवस) बाराव्या दिवशी उपवास करावा. आसनाकरिता वापरलेल्या तांदळाचा भात करून प्रसाद म्हणून घरातील व्यक्तींनी ग्रहण करावा. त्यानंतर रोज रामरक्षेचा १ पाठ करावा. काही प्रसंगी रामरक्षेचा १, ५ किंवा ११ वेळा पाठ करून जल किंवा विभूती अभिमंत्रित करून वापरता येते.
रामरक्षा सिद्ध करण्याच्या दुसऱ्या पद्धतीत, चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजे गुढीपाडवा या दिवशी सूर्योदयाला शुचिर्भूत होऊन भस्म लाऊन राम रक्षा स्तोत्राचे संकल्पपूर्वक ११ पाठ करावेत. असे रामनवमिपर्यंत रोज करावे. आपण करार असलेली कुठलीही उपासना हि गुप्त ठेवावी. त्याची वाच्यता कुठेही करू नये.
तर आशा करतो कि आपण या माहितीचा लाभ घ्याल.
|| श्री राम समर्थ ||
No comments:
Post a Comment