Saturday, September 26, 2015

अध्यात्म कथा - पाठीराखा (भाग १)

"हरी, मस्त गुळगुळीत दाढी कर रे".
"हं, जरा डोकंपण मॉलिश करून दे." 
दिनूने बसल्या बसल्या फर्मान सोडलं. उद्या शेवटचा पेपर होताना. ओसी. मग काय सुट्टी ना राव. डायरेक्ट जुलै मध्ये कॉलेज सुरु होणार. सिनिअर कॉलेज. स्वारी एकंदर मजेत होती. ओसी काय हातचा मळ. पेपर झाला कि डायरेक्ट अड्डा गाठायचा. गप्पांचा असा काही फड रंगेल कि विचारू नका. हरी तर आपला दोस्त. तरीसुद्धा घरी जाऊन थोडातरी शेवटचा हात मारलाच पाहिजे होता. व्यवस्थित केशकर्तन झाल्यानंतर दिनू घरी गेला. रात्री साधारण १२ वाजेपर्यंत तरी अभ्यास करत बसला होता. पुन्हा सकाळी पाच वाजताच अलार्म लावला होताच. पेपर सकाळी अकरा वाजता होता. सेंटर हि जवळच अंधेरी. नाक्यावरून बस पकडायची बोरीवली स्टेशन पूर्वेला आले कि एक दोन नंबरला येणारी चर्चगेट स्लो घ्यायची. अंधेरीला उतरला कि सरळ कॉलेजचा रस्ता. अर्धा पुन तासाचा प्रश्न. हेच रूटीन होत गेल्या १० दिवसा पासून. दिनूने सर्व आराखडा मनात मांडून ठेवला होता. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.श्री स्वामी समर्थ... जप करत करत झोप कधी लागली तेच कळल नाही दिनूला. 
बरोबर सकाळी पाच वाजता अलार्म वाजत होता. बराच वेळ वाजत राहिला. शेवटी आईने येऊन बंद केला आणि दिनूला उठवायला लागली. 
"दिन्या,गाढवा उठ." 
"उठ अरे."
"तूच तर म्हणाला होतास ना लवकर उठाव म्हणून?"
"अरे अभ्यास नाही का करायचा?"
"चल मेल्या उठ."
दुनियेतल्या सगळ्या आया ज्याप्रमाणे आपल्या दिवटयांना जसं अगदी अनादी काळापासून असेच झोपेतून उठवत आल्या असाव्यात तसाच दिनूच्या आईचापण अवतार होता. 
पण दिनूला अजिबात उठवत नव्हत. कसं उठवेल? डोकं प्रचंड जड होत. अंग चांगलंच तापल होत. थोडक्यात काय चागलाच ताप भरला होता. 
"अगंबाई, आता काय करावं?"
"पोर चांगलाच तापलय "
त्या माउलीच्या काळजाचा ठोकाच चुकला. पोराचा शेवटचा पेपर होता. चुकून कसा चालेल? सगळी वर्षभराची मेहनत वाया जाणार. दिनू अर्ध्या झोपेतच कण्हत होता. 
"अहो!! अहो ऐकलत का? "
"उठा हो."
"दिनूला ताप आहे. त्याला डॉक्टरकडे घेऊन जायला हव आधी"
दिनूच्या आईने त्याच्या बाबांना खबर दिली.
"अगं साडेपाच वाजलेत पहाटेचे, आता कुठे डॉक्टर असायला. जरा थंड पाण्याच्या पट्ट्या ठेव कपाळावर. ९ वाजता घेऊन जाऊ डॉक्टर कडे." बाबांना सुधा काय करावं सुचेना. 
"अहो पण पेपर आहे त्याचा ११ वाजता , लवकर न्यायला हवा त्याला डॉक्टर कडे"
दिनूच्या आईचा काळजीचा सूर लागला होता.
"तू काही काळजी करू नकोस. महाराज आहेत ना. देव्हार्यातला अंगारा लाव त्याला. होईल सर्व ठीक."
बाबांच्या श्रद्धाळू मनाने केव्हाच निर्णय देऊन टाकला. 
सकाळी आठ वाजले होते. 
"अगं ऐकलं का, मी जरा जोशींकडे जाऊन येतो महत्वाच काम आहे. दिनूला म्हणावं आवरून घे जाईन त्याच्या बरोबर डॉक्टरकडे " 
बाबांनी दिनूच्या आईला सांगितलं आणि बाबा निघून गेले.
काहीश्या ग्लानीतच दिनूने सर्व आवरल. ११ च्या पेपरला ९ वाजता निघायलाच हव होत घरातून. अजून बाबांचा पत्ता नव्हता. दिनूने एकटाच जाण्याचा निर्णय घेतला. बाबा कदाचित अडकले असावेत कुठेतरी. नाहीतर नक्कीच घरी आले असते.
"ऐक रे दिनू.बाळा, नको जाउस आज पेपरला. कसा जशील. सकाळी ताप होता ना तुला. अजूनही अंग गरम लागतय "
आईने दिनूला खूप समजावण्याचा प्रयत्न केला.
"डोन्ट वरी, आई. मी डॉक्टर काकांकडे जैन. औषध, इंजेक्षन वगैरे घेईन आणि मग जाईन पुढे. काळजी करू नकोस." 
दिनू काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. काहीच न ऐकता तो निघालाच. सव्वा नऊ झाले होते. अंगात ताप.ऐन मार्च महीन्याच उन. समोरच सर्व धूसर दिसत होत. रिक्षानेच दिनु डॉक्टर कडे गेला. पण डॉक्टर विझिट ला गेले होते. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. दिनूचे नामस्मरण चालूच होते. डॉक्टरांच्या पत्नी सौ. सावंत काकुनी दिनूला कसलीशी गोळी दिली. 
"काळजी करू नकोस ह्या गोळीने ताप उतरेल अर्ध्या तासात बर वाटेल", अस त्या म्हणाल्या. 
काकुना धन्यवाद देऊन दिनू तिथून निघाला. आज शेवटचा पेपर होता ना. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. दिनूचे नामस्मरण चालूच होते. दिनूला अत्यंत अशक्तपणा वाटत होता. त्याचा निर्णय पक्का होता. कुठल्याही परिस्थितीत तो पेपरला जाणारच होता. 
                                                                                                                                              क्रमशः
.

No comments:

Post a Comment