Saturday, September 26, 2015

देव का मानायचा?

देव का मानायचा? देवाला कोणी पाहिले? देव हि कन्सेप्ट काय आहे? इंटरेस्टिंग प्रश्न. जबरदस्ती नाही.देव हि मानायची गोष्ट नाहीच आहे मुळी.देव हे एक अनुभूती आहे. ती अनुभवण्याची गोष्ट आहे.हवा कोणी पाहिली? टेलिफोन सिग्नल कोणी पाहिला? गुरुत्वाकर्षण कोणी पाहिले? शेकडा ९० टक्के लोक देव का मनात असावेत? कारण आपल्या लहानपणा पासून आपण पाहत आलेलो आहोत. कोणीतरी सावित्री पिंपळाला प्रदिक्षिणा घालत आहे. जोशींचा दिनेश दर मंगळवारी सिद्धिविनायकाच्या मंदिरात जात असतो. शिंदे काका दर शनिवारी मारुतीला तेल वाहतात. हि काही प्रातिनिधिक उदाहरणं आहेत. तिरुपती बालाजी, शिर्डी साईबाबा, गाणगापूर, शेगाव, शनि शिंगणापूर, वैष्णो देवी,अमरनाथ.. अनेक तीर्थयात्री वर्शोवर्षे तीर्थस्थानी जात असतात आणि जात राहतील.काय भावना असावी त्यापाठी.. प्रेम? भीती? आसक्ती? इच्छा? मोह? विद्यार्थी जातो – परीक्षेत चांगले मार्क्स मिळावेत म्हणून. तरुण जातो चांगली बायको आणि नोकरी मिळावी म्हणून. प्रमोशन मिळावे म्हणून. कोर्टाची केस जिंकावी म्हणून. घर मिळावं, गाडी मिळावी, सर्व सुरळीत चालावे म्हणून. पण देव कोणालाच नको आहे? देवासात्ठी कोणी जात नाही. वर्षातून एकदा कुलस्वामिनीचे दर्शन नाही घेतले तर तिचा कोप होईल. म्हणून जायचे. भीतीपोटी. ती तर आई आहे. आईचा कधी आपल्या अपत्यावर कोप होतो का? मुल आपल्या आईला लाथा मारते तरी सुद्धा ती माउली त्याच्यावर प्रेम करते आणि त्याची काळजी वाहते. असा आहे देव. आपण मुल व्हायला हवं.संपूर्ण शरणागत. तेव्हाच त्याचा अनुभव येतो. म्हणूनच श्री कृष्णाने गीतेमध्ये म्हटले आहे – अनन्याश्चीन्तायो मां ये जनः पर्युपासते | तेषां नित्याभियुक्तानां | योगक्षेमं वहाम्यहम| – अनन्य भावाने जो माझी भक्ती करतो, म्हणजेच मला शरण येतो, त्याचा योगक्षेम मी चालवतो. सर्व त्याच्याच सत्तेने चालले आहे. सर्व त्याचीच ईच्छा. म्हणून श्री स्वामी समर्थ महाराज म्हणतात – तू भिऊ नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे.
स्वामी विवेकानंद म्हणतात देव हा आपल्यातच आहे. सो हम. म्हणजे तो मीच आहे. अहं ब्रह्मास्मी. मीच ब्रह्म्हा आहे. आपल्यातल्या त्या देवाला आपण जेव्हा शोधतो तेव्हा आपण पूर्णत्वास जातो. पण त्यासाठी सुरुवात तर करायला हवी. तो शोध घेण्याची ईच्छा आपल्या मनात निर्माण व्हायला हवी. हेच अध्यात्म. आधी आत्मा. आधी मी. तो माझ्यात आहे. तो तुझ्यात आहे. तो सर्वत्र आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात – जे जे भेटिजे भूत,ते ते मानिजे भगवंत. त्या अंतर्यामीच्या देवाला भेटण्याचे अनेक मार्ग आहेत त्यापैकी तीन महत्वाचे मार्ग – कर्म, भक्ती आणि ज्ञान. शिवाय आपण आपली पात्रता हि सिद्ध करायला हवीच कि. आपण भक्त व्हयला हवं. आपण साधक व्हायला हवं. साधकाच्या अंगी असणारे गुण आपल्यात असायला हवेत. त्या गुणांची चर्चा करूया .. लवकरच.
देव का मानायचा? सोप्प आहे. कोणी सांगितले म्हणून नाही मानायचा, त्याचा अनुभव आला तरच मानायचा. पण अनुभव येण्यासाठी तर प्रयत्न करूया.

1 comment: