कोणीतरी
श्री रमण महर्षीना विचारले, आयुष्यात सर्व काही नशिबानेच घडत असते कि त्यात मानवाचे कर्म, त्याच्या इच्छा, वासना सुद्धा अंतर्भूत आहेत? त्यांचा काही वाटा आहे? मानवाचा काही रोल आहे? श्री महर्षी म्हणाले. तुमचे अस्तित्वच कुठे आहे? तुम्ही नाहीच आहात तर तुमच्या इछेचा, तुमच्या कर्माचा वाटा असण्याचा प्रश्नच कुठे उद्भवतो?
ह्याचा
अर्थ असा कि, ईश्वरच सर्वत्र व्यापून उरला आहे. ईश्वरच स्वतःला अनेक रुपात अभिव्यक्त करतो. जे जे भेटिजे भूत| ते ते मानिजे भगवंत | हि सर्व त्याचीच लीला आहे. जे जे म्हणून आपल्याला, आपल्या डोळ्यांना आहे असे दिसते, तो आभास आहे. all it is a delusion.
तो एकच आहे. त्याच्याशिवाय काहीच नाही. अशा परिस्थितीत आपल्या असण्याचा आणि आपण काही करण्याचा प्रश्नच नाही. तुम्ही म्हणता मी जन्मलो, मी शिक्षण घेतले, मी काम करतो, मी पैसे मिळवतो, मी लग्न केले, हे माझे मित्र, हे माझे पालक, हि माझी पत्नी, हि मी मुले.... मी. मी. मी. माझे.
रोज सकाळी सूर्योदय होतो. तुम्ही करता का? तुमच्या शरीरात चयापचय क्रिया होत आहेत. रुधिराभिसरण होत आहे. ह्रदय चालू आहे. श्वासोत्श्वास चालू आहे. अन्नपचन चालू आहे. तुम्ही करता का हे सगळ? अनेक जीव जन्माला येतात. अनेक मरण पावतात. फुल फुलतात, नद्या वाहतात सृष्टीचे हे चक्र अव्याहत चालू आहे. तुम्ही म्हणता तुम्ही आहात. हे चालू आहे तुमच्या आधी पासून आणि चालू राहील तुमच्या नंतर हि. आपण म्हणतो समुद्रात लाटा उसळतात, प्रत्यक्षात काय आहे. पाणीच आहे. पाण्याची पातळी कुठे खाली तर कुठे वर. त्यामुळे ती लाट दिसते. प्रत्यक्षात ती लाट नाहीच. पाण्याचे एक रूप आहे. पाणीच ते. सखल भागात साचून राहते ते डबके. थोड्या प्रमाणात वाहते तेव्हा झरा, अनेक झरे एकत्र येतात झाली नदी. समुद्राजवळ मिळाली कि खाडी. डोळ्यातून वाहिले कि अश्रू. एका पाण्याची कितीहि रूपं. असाच आहे तो ईश्वर. अनादी. अनंत. स्वतःला अनेक रूपातून व्यक्त करणारा.
मी आहे! हाच जो भाव आहे तो सगळ्या उपाधींचे मूळ आहे. सगळे राग द्वेष, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, आणि मत्सर हे त्या मी चे विविध आविष्कार आहेत. कोण आहोत आपण? कुठून आलो आपण? कुठे जायचे आहे आपल्याला शेवटी? काय आहे आपला मुळ स्वभाव? कशाच्या शोधत आहोत आपण? काय हवे आहे आपल्याला? अनंत प्रश्न. अनंत इच्छा. आणि शेवटी confusion!
खरे तर आपल्याला आपल्या असण्यापेक्षा सत्य काहीच नाही वाटत. कारण आपण कितीही विचार केला तरी आपपल्या बुद्धीची झेप तोकडी पडते. आपण आपल्या मी पणाला सत्य समजून बसतो.असे असूनही शास्त्रांमध्ये ईश्वर, आत्मा, जीव इत्यादी विषयांचा देखील उहापोह केलेला दिसून येतो. प्रत्येकाच्या कर्मानुसार पुनर्जन्म. प्रारब्धानुसार कर्माचे फळ इत्यादी गोष्टींचा उल्लेख आढळतो. जर व्यक्ती जीव आपण आपले अस्तित्वच नाही तर आत्मा काय आहे? कर्माचे फळ काय आहे? पुनर्जन्म कोणाचा होतो? ह्या सगळ्याची उत्तरे श्रीमद्भागवतात [४:२२:२२ ते ३४ ] अत्यंत सोप्या शब्दात, थोडक्यात आणि समर्पकपणे दिली आहेत.
जशा प्रकारे आरशामध्ये आपण आपले प्रतिबिंब पाहतो. आपल्याला माहित आहे कि ते प्रतिबिंब आहे. त्या प्रतिबिंबाला आपण स्वतः समजतो का? नाही. आपली बुद्धी असा निर्णय देते कि आपण आणि आरशातले आपले प्रतिबिंब हे वेगळे आहेत. तसेच परमात्मा. ईश्वर लिंग शरीराच्या योगाने अभिव्यक्त होतो. म्हणजेच आपले लिंग शरीर (subtle body) हे परमात्म्याचे प्रतिबिंब आहे. रूपं आहे. पण जर तुम्हीच नसाल तर प्रतिबिंबाला काय अस्तित्व उरले. तुमची प्रत्येक हालचाल आरशातल्या प्रतिमेत दिसते. म्हणजेच प्रतिमेला तुमच्या शिवाय काहीच अस्तित्व नाही. थोडक्यात तुम्ही, मी इतर सगळे एकच ईश्वराची विविध प्रतिमा आहोत. पण आपण मी पणात अडकलो आहोत. इथेच आपण ईश्वरापासून वेगळे होतो. मी सकट सगळ्या उपाधी आपल्याला येउन मिळतात. हाच अहंकार. आपण आपले मुळ स्वरूप विसरतो. मायेत गुरफटतो. हाच खरा आभास. delusion. काय आहे आपले मुळ स्वरूप? कसे ओळखणार आपण आपल्या मुळ स्वरूपाला?
ह्या सर्वाची उत्तरे सापडत नाहीत. जीव व्याकूळ होतो. कासावीस होतो. आणि त्याच्या आयुष्यात अध्यात्माची पहाट होते. जगाकडे पाठ फिरवून तो अधिकाधिक ईश्वर सन्मुख होतो. ईश्वरावर प्रेम करू लागतो. त्याचा अनुनय करतो. त्याच्यावरच आसक्त होतो. त्याचेच रूप, त्याचाच रस, त्याचाच गंध, त्याचेच स्मरण, त्याचेच कीर्तन, त्याचेच पादसेवन, त्याचेच पूजन, त्याचेच अर्चन, मग तोच पिता, तीच माता, तोच सखा, तोच सर्वकाही, सर्व उपाधी नष्ट होतात, आणि असा भाव जागृत होतो . त्वं एवं प्रत्यक्षम कर्तासी (सर्व तूच करतोयस) भक्तीचे अनेक रंग आविष्कृत होतात, जन्मोजन्मीचे पुण्य फळाला येते. सद्गुरूंची भेट होते. वैराग्याचा उदय होतो. संपूर्ण शरणागत मुमुक्षूचा साधक होतो. अशाप्रकारे ज्ञानाग्नी प्रज्वलित झाला कि त्याच्या वासना शुन्य होतात आणि त्या ज्ञानाग्निमध्ये त्याचे लिंग शरीर (सूक्ष्म शरीर )भस्म होते. जोपर्यंत जीवाचे लिंग शरीर भस्म होत नाही तो पर्यंत तो वेगवेगळ्या योनीत जन्म घेत राहतो. असा तो ईश्वर पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या स्वरुपात आभासमान होत राहतो.
लिंग शरीराचे भस्म होण्याकरिता साधना करणे आवश्यक आहे. स्वतःचे स्वरूप ओळखण्याकरिता साधना करणे आवश्यक आहे. साधनेमुळे ज्ञान आणि वैराग्य प्राप्त होते. हि साधना म्हणजेच भक्ती. भक्ती योग. निष्काम उपासना.
संत साहित्यात, धार्मिक ग्रंथांमधून, वेद, पुराण, श्रीमद्भागवत इत्यादी ग्रंथांमधून ह्याविषयी खूप माहिती उपलब्ध आहे. त्या ईश्वराची भक्ती करण्याचे अनेक मार्ग आहेत. अनेक प्रकार आहेत. अनेक तंत्र आहेत. अनेक रस्ते आहेत. असा हा साधनमार्ग जितका सोपा तितकाच खडतर. चर्चा करूया. लवकरच. तो पर्यंत.
- देवाचिये द्वारी उभा क्षणभरी | तेणे मुक्ती चारी साधियेल्या | (ज्ञानदेव माउली )
हरी ओम तत्सत!!
No comments:
Post a Comment