Tuesday, October 20, 2015

मृत्यू भय.

साधारण पन्नाशी - साठी ओलांडलेली असते. आयुष्यात तसे स्थिर असतो. समाजात पत प्रतिष्ठा असते. मुलं सेटल झालेली असतात. सर्व काही ठीक असते. बऱ्यापैकी  पैसा गाठीला असतो. आयुष्यात बरेच काही केलेले असते आणि बरंच काही करायचे राहून गेलेले असते. आणखी एक विचार सतावतो. मृत्यचा. एक ना एक दिवस जायचेच आहे, पण असं वाटते कि मृत्यू शांत पणे यावा. विना वेदना.
जर अशी व्यक्ती आहे कि जिने आयुष्यभर कोणाचे वाईट नाही केले. कोणाचा अपमान किव्वा कोणाला शिवीगाळ नाही. अगदी सरळ आयुष्य जगाला. छक्केपंजे नाहीत. राजकारण नाही. वगैरे वगैरे. अशा व्यक्तीला तर वाटायलाच हवं, मला मरण यावं कसं, शांत पणे. पण जर अपभाती मृत्यू आला तर? कोणी विषप्रयोग केला तर? अर्धांगवायू झाला, खितपत पाडाव लागलं, अपंगत्व आलं तर? एखादा साधक असा प्रश्न विचारणारच. मीच का? मी काय कोणाच वाईट केलं?
साधना मार्गात असे टप्पे येतात. भीती वाटते. चित्त अशांत होते. हतबल वाटत.
येशु ख्रिस्ताला क्रुसावर टांगले होते. खिळे ठोकून मारले होते. किती वेदना झाल्या असतील त्यांना? श्री राम कृष्ण परमहंस आणि रमण महर्षीना तर कॅन्सर झाला होता. किती वेदना झाल्या असतील त्यांना? ओशोच्या बाबतीत हि असेच झाले होते, त्यांना देखील किरणोत्साराचा त्रास आणि त्यामुळे वेदना झाल्या होत्या. ह्याचा अर्थ असा आहे कि साधकाची साधना. त्याची वागणूक आणि त्याला येणाऱ्या मरणाची परिस्थिती अथवा प्रकार ह्याचा काही संबध नाही. त्यामुळे मीच का? ह्या प्रश्नाला कितपत अर्थ उरतो?
पण अशा लोकोत्तर विभूतींचा विचार केला तर असं म्हणता येईल कि त्यांना त्यांच्या शरीराचे भानच नव्हते. साधने मध्ये अशी परिस्थिती येते. किव्वा सिद्धी म्हणता येईल तिला. अशा विभूती स्वतःच्या शरीराकडे साक्षीभावाने पाहतात. त्या सतत एका वेगळ्याच ट्रान्स मध्ये असतात. त्यांच्या जाणीवा इतक्या विस्तृत असतात कि त्यांना असे अनुभवास येत असते कि जे काही होते आहे ते अशा एखाद्या व्यक्तीला होत आहे जो आपल्यापासून दूर आहे. ते अनुभवत असतात ते असते समाधी सुख. आणि मृत्यू हा त्यांच्यासाठी ठरतो एक सोहळा.
आणखी एक विचार असा कि, जीवाच्या इच्छा, कामना, वासना इत्यादी अजून पूर्ण नाही झाल्या. अजून नातवंडाचे तोंड बघायचे असते. व्यवसाय असेल तर अजून भरभराटीस आणायचा असतो. वडिलोपार्जित संपत्ती मध्ये भर घालायची असते. कदाचित एखाद्या व्यक्ती मध्ये मन गुंतलेलं  असतं, असू शकत. अनेक इच्छा. अशी व्यक्ती मग ती कितीहि साधना करत असली तरी तिला मृत्यू भय राहणारच. दुःख होणारच.
आणि म्हणूनच निवृत्त व्हायचे असते. हवेपणा निघून जायला हवा. सर्वातून मन काढून घेतलं पाहिजे. मी कोणीही नाही. मला काहीही नको. मनाला उलटे करायचे असते .. नाम. अंतकाळी सुटणारी एकच गोष्ट असायल हवी - त्याचे नाम.  म्हणूनच त्याची तयारी कार्याला हवी. लवकरात लवकर. सवय नको का व्हायला!

No comments:

Post a Comment