Friday, October 9, 2015

अध्यात्मिक साधनेकरीता आवश्यक गुण संपदा - क्षमा (Forgiveness)



काय गुन्हा होता राजा परिक्षिताचा? (King Parikshit) अगदी नगण्य चूक. तसं तर आपल्याकडे अनेक मुले, मोठी माणसे सुद्धा करतात. त्याचं असं झालं. राजा परीक्षित एकदा शिकारी करिता जंगलात गेला होता. शिकारी दरम्यान त्याला तहान लागली म्हणून तो एका झोपडीत शिरला. पाहतो तर तिथे एक साधू ध्यानमग्न होता. राजाने त्या साधूला नमस्कार केला. राजाने त्या साधूला त्याच्या येण्याचे कारण सुधा सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु त्या साधूकडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. सहज म्हणून राजाने एक मेलेला सर्प साधूच्या गळ्यात घातला. आता हे त्या साधूच्या मुलाने श्रीन्जीन याने पहिले आणि राजाला शाप दिला - आज पासून दिवसांनी सर्प दंशाने तू मृत्यू पावशील.
कोण होता हा राजा परीक्षित? अर्जुन पुत्र अभिमन्यूचा मुलगा. ज्याला महाभारत युद्धाच्या शेवटी प्रत्यक्ष भगवान कृष्णाने कृपांकित असे जीवदान दिले कारण उत्तरेच्या गर्भात असताना अश्वत्थाम्याने त्याचा ब्राह्मास्त्राने ठार करण्याचा प्रयत्न केला होता. अशा ह्या राजाने युधीष्टीरानंतर सुमारे २३ वर्षे हस्तिनापूरचे राज्य केले. अत्यंत पराक्रमी आणि प्रजाहित दक्ष असा हा राजा. असे म्हणतात कि त्याच्या राज्यात प्रजा रामराज्यात असल्यासारखी सुखी आणि समाधानी होती. अशा राजाला क्षुल्लक चुकीमुळे असा शाप मिळावा?
काय केले राजाने? त्याने मनात आणलं असतं तर क्षणार्धात त्या साधूच्या मुलाला ठार करू शकला असता. तो राजा होता. त्याच्याजवळ सैन्य होते. तो त्या मुलाला कोठडीत टाकू शकला असता. पण त्याने तसं केल नाही. राजाने आपल्या राज्याचा त्याग केला. आपला पुत्र जनमेजय याच्यावर राज्याची जबाबदारी सोपवून आयुष्याचा उरलेला काळ गंगेकाठी बसून श्री साधू महर्षी व्यासपुत्र शुक महाराज यांच्याकडून श्रीमदभागवत पुराण श्रवण केले. व्या दिवशी नागराज तक्षकाने त्याचा चावा घेतला आणि अशाप्रकारे राजा परीक्षित मरण पावला आणि त्याला मोक्ष मिळाला. तशी महाभारतातली हि एक साधी कथा, पण असा कुठला गुण राजा परीक्षित कडे होता? - क्षमा. आणि सहनशीलता. तितिक्षा. एकदा अक्कलकोट स्वामींच्या आदेशानुसार श्री बिडकर महाराज नर्मदा परिक्रमा करीत होते. वाटेत असेच तेही एका साधूच्या कुटीत अश्रयाकरिता राहिले. साधूची सेवाही ते करायचे. साधुनेही त्यांना ठेऊन घेतले. साधू रोज बालकृष्णाच्या मूर्तीची पूजा करायचा. अतिशय तल्लीन होऊन त्याची पूजा अनेक तास चालायची. एकदा असे झाले, बिडकर महाराज त्या साधूची पूजा बघत राहिले आणि त्यात त्या साधूने त्यांना सांगितलेले काम करायचे राहून गेले. साधूला आला राग. जवळच्या काठीने त्या साधूने ने बिडकर महाराजांना असे काही मारायला सुरुवात केली कि विचारता सोय नाही. काठीचा मार खाऊन बिडकर महाराजांची पाठ सडकून निघाली. पण त्यांनी त्या साधूला चांगली अद्दल घडविण्याऐवजी त्याची माफी मागितली. दुसऱ्या दिवशी काय गम्मत झाली सांगतो. रोजच्या पूजेत असलेल्या बाळकृष्णाच्या मूर्तीच्या डोळ्यातून अश्रू यायला सुरुवात झाली. साधूला कळेना काय चाललंय, त्या रात्री साधूला दृष्टांत झाला कि त्याने जे बिडकर महाराजांना मारहाण केली त्यामुळे मूर्तीच्या डोळ्यातून अश्रू येत होते. पहा,. हीच होती बिडकर महाराजांच्या भक्तीची परिसीमा. क्षमा, सहनशीलता आणि शांती. भक्ती मार्गावर अग्रेसर होताना हे दोन गुण जर साधकाच्यापाशी असलेच पाहिजेत. चित्तशुद्धी साठी आवश्यक आहेत ते. जगातलि सर्व शस्त्रे, अण्वस्त्र, ह्याची गरजच उरणार नाही. वरील राजा परीक्षिताच्या कथेचा संदर्भ  हा श्रीमद भागवत पुराणात आलेला आहे.

एकदा संत एकनाथ महाराज नदीवर अंघोळी करिता गेले होते. आपली वस्त्र तिथेच घाटावर ठेऊन ते पाण्यात उतरले. सुर्य महाराजांना अर्ध्य दिले स्नान आटोपून परत घाटावर आले. धोतर नेसण्या करिता  त्यांनी जसे ते उचलले तसे एका विंचवाने त्यांच्या बोटाला दंश केला. आत्यंतिक वेदनेमुळे त्यांनी हात झटकला. त्यामुळे तो विंचू पाण्यात पडला. एकनाथ महारजांनी काय करावे, त्यांनी त्या विंचवाला पाण्याबाहेर काढले आणि सोडून दिले. त्याचा प्राण वाचवला. एक जण त्यांना म्हणाला, अहो हे काय? चांगला ठेचून काढायचा कि त्या विंचवाला. एवढा दंश केला त्याने तुम्हाला तो ? एकनाथ महाराजांनी काय म्हणावं? दंश करणे हा त्या विंचवाचा स्वभाव आहे. तो त्याच्या स्वभावा प्रमाणेच वागणार. आपण आपल्या स्वभाव प्रमाणे वागावे. - दया. क्षमा. हाच मानव धर्म आहे. हाच मानवाचा मुल स्वभाव आहे. संत नामदेव महाराजहि तसेच. नदीवरून अंघोळ करून परत येत असता वाटेत त्यांच्यावर एक यवन थुंकायचा. हे आपले शांत. परत जायचे अंघोळ करायचे, हा आपला परत थुंकायचा. परत अंघोळ, परत थुंकणे, परत अंघोळ, शेवटी त्या यवनालाच  स्वतःची लाज वाटली असावी आणि त्याने तो प्रकार बंद केला. - कसे होते संत नामदेव? दया मूर्ती. भगवान बुद्धांजवळ एक  माणूस गेला आणि त्यांच्यावर देखील थुंकला. भगवान बुद्ध. शांत. एकाने त्यांना विचारले भगवान आपण शांत कसे? त्यावर भगवान म्हणाले, त्याला काय म्हणायचे होते ते त्याने कृतीतून सांगितले. त्याला काय म्हणायचे होते त्यासाठी त्याच्याजवळ शब्द नव्हते. त्याच्यासाठी योग्य कृती काय होती ती मी केली. दुसऱ्या दिवशी तो माणूस पुन्हा भगवान बुद्धांजवळ गेला आणि त्यांच्या पाया पडला. 

हे आणि असे अनेक दाखले, उदाहरण आपल्याला संत साहित्यात, पुराण, उपनिषद, वेद ह्यातून मिळतील ह्यातील थोडे अगदी थोडे जरी आपण आपल्या आचारणात आणले तर दिवस कसा छान जाइल. संत श्री गोंदवलेकर महाराजांना एकाने प्रश्न विचारला, महाराज! दिवस छान जाणे म्हणजे काय? देवाची आपल्यावर कृपा आहे हे कसे ओळखायचे? काय म्हणाले महाराज माहित्ये का?
दिवसभर भरपूर नामस्मरण झाले कि समजायचे दिवस चांगला गेला. आणि ते नामस्मरण होतेय म्हणजे रामाची कृपा आहे म्हणायचे. असा कायम नामात असलेला मनुष्य का नाही असणार साक्षात दयामुर्ती. सहनशील. शांत कारण त्याची अशी धारणा असते कि जे काही चालले आहे हि त्या रामाची इच्छा. कारण तो पूर्ण शरण असतो श्री रामाला. - हि अशी शरणागती शिकायला मिळते संतांकडून.


आणखी अशा अनेक सद्गुणांची चर्चा आपण करणार आहोत. पुढच्या लेखात.
तोपर्यंत. शुभ रात्री.
श्री राम राम राम , श्री राम राम राम, श्री राम राम राम, श्री राम राम राम. अहाहा किती गोड आहे तुझे नाम देवा.. ह्या नामाची ध्वजा अशीच उंच फडकवत ठेऊया.

No comments:

Post a Comment